दुकाने, ऑफीसेस आणि मोकळ्या जागेचाही समावेश
पुणे : Pune PMC Property Tax Arrears | मोठ्याप्रमाणावर मिळकतकर थकविल्याप्रकरणी सील केलेल्या ३२ व्यावसायीक मिळकतींचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून शनिवारी यासंदर्भातील जाहीर प्रकटन माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मिळकतींकडे १६ कोटी रुपये थकबाकी आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे प्रमुख अजित देशमुख (Ajit Deshmukh PMC) यांनी दिली आहे. (Pune PMC Property Tax Arrears)
देशमुख यांनी सांगितले, की मिळकत कराची थकबाकी असलेल्या मिळकती सील करण्याची मोहीम सुरू आहे. या मोहीमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात २०० हून अधिक व्यावसायीक मिळकती सील करण्यात आल्या आहेत. यापैकी ३२ मिळकतींची कायदेशीर व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मिळकत धारकांकडे १६ कोटी रुपये थकबाकी आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने शनिवारच्या माध्यमांमध्ये यासंदर्भात जाहिर प्रकटन देण्यात येणार आहे. ३२ मिळकतींमध्ये खराडी, वडगाव शेरी, बाणेर परिसरातील दुकाने, ऑफीसेसचा समावेश आहे. यासोबत पॅन कार्ड क्लबच्या काही जागेचाही लिलाव करण्यात येणार आहे. (Pune PMC Property Tax Arrears)
दरम्यान, महापालिकेला चालू आर्थिक वर्षामध्ये मिळकत करातून आज अखेर १ हजार ८२५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागीलवर्षी आजच्या दिवसापर्यंत १ हजार ५२५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होेते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३०० कोटी रुपये उत्पन्न अधिक मिळाले आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये मिळकत करातून १ हजार ९२५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. चालूवर्षीचे अद्याप तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे मागीलवर्षी पेक्षा यंदा उत्पन्नात निश्चितच वाढ होईल. यासाठी कर आकारणी व संकलन विभागाच्यावतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.