पुणे : मार्केट यार्डातील केळी मार्केट (Pune Market Yard News) समोरील पार्किंगमध्ये ट्रक चालकाला चाकूचा धाकाने लुटल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि.19) सकाळी आठच्या सुमारास घडली आहे.
याबाबत किशोर भागचंद रोमण (वय-31 रा. मु.पो. पोवळवाडी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन प्रकाश देवराम परिहार उर्फ पक्या (रा. गल्ली नं. 1, राम मंदीराजवळ, लोहियानगर, पुणे) याच्यावर आयपीसी 394 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर रोमण मार्केटयार्डातील फळ बाजारात शेतीमाल घेऊन आले होते. केळी बाजारासमोरील पार्किंगमध्ये ट्रक पार्क करुन थांबले होते. परिहारने रोमण यांना चाकूचा धाक दाखवला. रोमण यांच्या खिशातील मोबाइल आणि रोकड असा 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तो पसार झाला. याबाबत रोमण यांनी पोलिसांना कडे फिर्याद दिली. पोलिसांनी परिहारला ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.
Pune Crime | पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजले, पतीला अटक