पुणे : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीतील (Mahayuti) नेत्यांकडून सातत्याने अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका होताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपावरून महायुतीत वादंग होऊ शकतो. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. दरम्यान, पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची मुंबईत भेट घेऊन विधानपरिषदेच्या एका जागेची मागणी केलेली आहे.
विधानसभेच्या आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी करण्यासाठी विधानपरिषदेच्या जाहीर झालेल्या ११ जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घ्यावी ही लेखी मागणी पुण्यातील शिष्टमंडळाने अजित पवारांकडे केली आहे.
पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासाठी मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या २१ जागा आहेत. त्यातील अजित पवार यांच्या (बारामतीसह) ९ जागा पवार गटाकडेच आहेत.
मात्र, यातील अनेक जागांवर लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळण्याऐवजी प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळाले. खुद्द अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातही तीच स्थिती आहे. त्याशिवाय शिरूरमध्येही तेच झाले.
पुणे शहरातील हडपसर व वडगाव शेरी या दोन जागाही तिथे मागील निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने जागा वाटपात कदाचित अडचणीत येऊ शकतात असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विधान परिषदेच्या ११ जागांमध्ये किमान १ जागा पक्षाने पुण्यासाठी घ्यायलाच हवी, असे पुण्यातील पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राजकीयदृष्ट्या विधान परिषदेत पुण्याकडून एक आमदार असणे गरजेचे आहे.
विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा होईल, त्यावेळी त्याचा चांगला उपयोग होईल,
असे भेटीला गेलेल्या शिष्टमंडळातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
लोकसभेतील मताधिक्याचे कारण पुढे करत भाजपकडून विधानसभेला पुण्यात कदाचित जास्त जागा मागितल्या जातील.
त्याची आधीच काळजी विधान परिषदेतील एक जागा पदरात पाडून केलेली बरी,
असा विचार या मागणीमागे असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
“आम्ही अजित पवार यांची भेट घेतली व त्यांच्याकडे विधान परिषदेच्या एका जागेची मागणी केली, हे खरे आहे.
अजित पवार घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असणार आहे.
मात्र, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे ते नेत्यांकडे नेले पाहिजे.
मागणीच झाली नाही असे व्हायला नको म्हणून आम्ही भेट घेतली”
अशी माहिती दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष ) यांनी दिली आहे.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune Drugs Case | पुणे L3 – Liquid Leisure Lounge ड्रग्ज पार्टी प्रकरण :
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका निरीक्षकाचे निलंबन; आतापर्यंत 6 जणांवर कारवाई