पिंपरी : Pune Crime News | मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन टोळक्याने हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत माजवली. हा प्रकार थेरगाव येथील पदमजी पेपर मील जवळ सोमवारी (दि.29) दुपारी पावणे एकच्या सुमारास घडला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
याबाबत आनंद सुभाष जेवुरकर (वय-29 रा. हिरामण बारणे चाळी जवळ, पदमजी पेपर मील, थेरगाव, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अखिल उर्फ आदेश सुधीर बाबर व त्याच्या इतर दोन साथीदारांवर आयपीसी 307, 323, 506 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत हिरामण चाळीत गप्पा मारत थांबले होते. दुपारी पावणे एकच्या सुमारास त्यांच्या ओळखीचा आरोपी अखिल उर्फ आदेश बाबर दुचाकीवरुन दोन साथीदारांसह त्या ठिकाणी आला. आरोपींनी आनंद जेवुरकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर अखिल याने त्याच्या कंबरेला असलेला कोयता काढून फिर्यादी यांच्या डोक्यावर मारला. मात्र, त्यांनी हात मध्ये घातल्याने कोयत्याचा वार हातावर बसला.
फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून दहशत माजवली. तसेच कोणी आडवे आला तर मुडदा पाडेन अशी धमकी दिली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चाळीतील नागरिकांनी घाबरून घरे बंद करुन घेतली. त्यानंतर आरोपी अखिल व त्याचे इतर दोन साथीदार दुचाकीवरुन पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने करीत आहेत.
Follow pune.news on : https://news.google.com/publications/CAAqBwgKMPDv0Aswr4voAw
हे देखील वाचा
Pune News | ज्ञान-भक्ती -संस्कृतीचा पुण्यात अनोखा महोत्सव ! 5 फेब्रुवारीपासून चार दिवस श्री श्री रविशंकर पुणे दौऱ्यावर
Digital Media Sampadak Patrakar Sanghatana | प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
Pune Crime News | दर महिन्याला 8-9 टक्के परताव्याचे आमिष दाखवून 70 लाखांची फसवणूक, कोंढव्यातील सलमान शिरोळकर याच्यावर MPID